Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeराजकीयआमदार देवराव भोंगळेंना वरूर–विरूर रस्त्याचा विसरच पडला का?

आमदार देवराव भोंगळेंना वरूर–विरूर रस्त्याचा विसरच पडला का?

प्रविण चिडे विरुर
तालुका प्रतिनिधी ( राजुरा )

राजुरा तालुक्यातील वरूर–विरूर–चिंचोली–आंतरगाव हा मुख्य दळणवळणाचा रस्ता आज मृत्यूचा सापळा ठरत आहे. मोठमोठे खड्डे, उखडलेली डांबरीकरण, धुळीचे साम्राज्य आणि पावसात चिखल — या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू असल्याचा संतप्त आरोप नागरिक करत आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून संपण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. परंतु एवढ्या महत्त्वाच्या अधिवेशनात वरूर–विरूर रस्त्याचा साधा उल्लेखही झाला नाही, ही बाब धक्कादायक आहे. आमदार देवराव भोंगळे यांना या रस्त्याचा विसर तर पडला नाही ना, असा थेट सवाल आता परिसरात उपस्थित केला जात आहे.

या रस्त्याच्या प्रश्नासाठी वरूर, विरूर, चिंचोली व आंतरगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत ‘विरूर क्षेत्र समिती’ स्थापन केली. आमदारांना निवेदन देण्यात आले, चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तरीदेखील प्रशासन व आमदारांकडून केवळ आश्वासनांची बोंबाबोंब, प्रत्यक्षात मात्र शून्य काम, अशी स्थिती आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान विरूर येथील जाहीर सभेत, मला निवडून द्या, सर्वात आधी वरूर–विरूर रस्ता मंजूर करून काम सुरू करतो,” असे ठाम आश्वासन देण्यात आले होते. विकासाचा दादा म्हणून मिरवणूक काढणाऱ्या आमदारांकडून आज मात्र विकासाचे शब्दही विधानसभेत ऐकू येत नाहीत, ही जनतेची मोठी फसवणूक असल्याचे बोलले जात आहे.

या रस्त्यावरून रोज शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, गर्भवती महिला, शेतकरी व कामगार प्रवास करतात. अपघात वाढत आहेत, वाहने खराब होत आहेत, रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचत नाहीत. तरीदेखील आमदारांना ही परिस्थिती दिसत नाही का? की हा परिसर केवळ निवडणुकीपुरताच आठवतो, असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत.

जर तात्काळ वरूर–विरूर रस्त्याच्या दुरुस्तीचे व नूतनीकरणाचे काम सुरू झाले नाही, तर आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन, रस्ता रोको आणि आमदारांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आता आश्वासन नकोत, काम दाखवा! अशी एकमुखी मागणी परिसरातून होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular