कोरपना (तालुका प्रतिनिधी): चंद्रपूर जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन गैरव्यवहार आणि भविष्य निर्वाह निधी (PF) घोटाळ्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कोरपना नगर पंचायतीमध्ये सफाई कामगारांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा पेट घेतला आहे. सहाय्यक आयुक्त व अंमलबजावणी अधिकारी कार्यालयातील निरीक्षक तृप्ती दोहे यांनी कोरपना नगर पंचायतीला थेट भेट देऊन कामगारांच्या पीएफ घोटाळा व तक्रारींबाबत प्रत्यक्ष चौकशी केली.
सन २०१८-१९ पासून कोरपना नगर पंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, सांडपाणी आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम सफाई कामगार अविरत करत आहेत. परंतु, कंत्राटदार भूषण इटणकर आणि रक्षक सिक्युरिटी या एजन्सींनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (PF) रक्कम नियमितपणे त्यांच्या खात्यावर जमा न करता मोठा अपहार व नियमबाह्य वापर केल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत स्पष्ट झाले आहे.
कंत्राटदाराचा बनाव आणि मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा
चौकशीदरम्यान कंत्राटदार भूषण इटणकर यांनी भ्रमणध्वनीवरून १५ लाख रुपये पीएफ भरल्याचा दावा केला. मात्र, कार्यालयात चालान किंवा कायदेशीर कागदपत्रे सादर केलेली नाहीत. यावर कोरपना नगर पंचायतीचे मुख्याधिकारी राम रावते यांनी स्पष्ट केले की, “कंत्राटदाराने बिलांचे दावे केले असले, तरी पीएफ भरल्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर न केल्यामुळे गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून कामगारांचे पगार रोखून ठेवण्यात आले आहेत.”
चौकशीला कंत्राटदारांची दांडी; निरीक्षकांचा गंभीर इशारा
कंत्राटदार आणि एजन्सींना करारनामा, वेतन नोंद रजिस्टर, पीएफ चालान आणि UAN खात्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, चौकशीच्या वेळी दोन्ही कंत्राटदार गैरहजर राहिले. या बेजबाबदारपणाची गंभीर दखल घेत निरीक्षक तृप्ती दोहे यांनी स्पष्ट केले की, दोन्ही कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात येईल आणि गैरव्यवहार सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
यासोबतच, आरोग्य निरीक्षक शंकर तांड्रा यांनी पीएफ भरल्याची कोणतीही खात्री न करता बिले का सादर केली? असा सवाल उपस्थित करत मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत.
कामगारांचे शोषण आणि प्रशासकीय दुर्लक्ष
शासनाच्या धोरणानुसार पीएफची रक्कम दरमहा पगाराच्या कालावधीतच जमा करणे बंधनकारक असताना, कंत्राटदारांनी गेल्या ७ ते ८ वर्षांपासून दाखवलेली अनियमितता आणि कामगारांची झालेली फसवणूक ही अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्या चार महिन्यांपासून थकीत असलेला पगार, पगारातील तफावत आणि कामगारांचे होणारे शोषण यावर तातडीने तोडगा काढून कामगारांना न्याय दिला जाईल, असे ठोस आश्वासन पीएफ निरीक्षकांनी कामगारांच्या समक्ष दिले.
या चौकशी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली, मुख्याधिकारी राम रावते, आरोग्य निरीक्षक शंकर तांड्रा यांच्यासह कामगार चरण पंधरे, आनंदराव आपटे, सुधाकर आत्राम, बंडू लसनते, पांडुरंग मेश्राम, संजय मालेकार, विशाल धोटे, दिगंबर साळूंके, राजू आत्राम, बादल भगत व इतर सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



