गडचांदूर (प्रतिनिधी-गौतम भसारकर):
एकीकडे सरकार विकासकामांचा डंका पिटत असताना, गडचांदूर-माणिकगड सिमेंट ते बैलमपूर रस्त्यालगत सुरू असलेल्या अमलनाला पाटबंधारे विभागाच्या कामात भ्रष्टाचाराचा मोठा ‘चमत्कार’ पाहायला मिळत आहे. वॉटर कॅनॉलच्या वॉल सपोर्टचे काम अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
‘उंटावरून शेळ्या हाकणारे’ अधिकारी
अमलनाला पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष कामावर लक्ष देण्याऐवजी ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचे’ काम करत आहेत. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी न करताच चंद्रपुर मुख्यालय बसून कागदोपत्री घोडे नाचवून निकृष्ट कामाला हिरवा कंदील दाखवला जात आहे. भिंतीचे काम अर्धवट असताना आणि झालेलं कामही हाताने मोडेल अशा स्थितीत असताना, बिल मात्र शंभर टक्के काढले जातात . हा नेमका कोणाचा प्रताप आहे? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
१०% ची टक्केवारी आणि भ्रष्ट युती
या संपूर्ण प्रकरणात “१०% लोकप्रतिनिधी आणि १०% अधिकारी” असे समीकरण जुळल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. ‘सर्व मिळून खाऊ, काम निकृष्ट होऊ द्या’ अशी जणू काही अलिखित युतीच येथे पाहायला मिळत आहे.
“काम तुटलं तर पुन्हा नवीन बनवू आणि पुन्हा निधी लाटू,” अशा वृत्तीमुळे सरकारी तिजोरीची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे.
“हा विकास आहे की विनाशाची नांदी? कष्टाचा पैसा अशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या गटारात जात असेल, तर या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” — संतप्त नागरिक
आता वेळ आली आहे या ‘चमत्कारी’ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची. अन्यथा, हे कॅनॉल शेतीला पाणी देण्याऐवजी भ्रष्टाचाराची गंगा वाहण्याचे केंद्र बनतील, यात शंका नाही.
ह्या संदर्भात पाठबंधारे विभागाचे मुख्य अभियंता जलेश सिंह ह्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही …




