वसुलीबाज आरटीओ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले!
चंद्रपूर/नागपूर:
भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर आज नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धाड टाकून पांडे आणि पोटदुखे या दोन बड्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा ‘वसुली’ सरकार आणि प्रशासनाच्या अब्रूचे वाभाडे निघाले आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या एक वर्षापूर्वी याच चेकपोस्टवर ट्रक चालकाकडून लाच घेताना विभूते मोटर वाहन निरीक्षक रंगेहाथ पकडला गेला होता. मात्र, मंत्रालयातील ‘वरदहस्ता’मुळे अवघ्या ३ महिन्यांत तो पुन्हा त्याच मलिदा मिळणाऱ्या पोस्टवर रुजू झाला. भ्रष्टाचाऱ्यांची सेटिंग इतकी जबरदस्त आहे की, निलंबन म्हणजे यांच्यासाठी जणू ‘पगारी सुटी’च ठरतेय!
चंद्रपूर एसीबी कड़े पुन्हा फिरवली तक्रारदाराने पाठ ?
या कारवाईचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तक्रारदाराने स्थानिक चंद्रपूर एसीबी युनिटकडे न जाता थेट नागपूरच्या टीमला साकडं घातलं.
“चंद्रपूर एसीबीवरचा तक्रारदारांचा विश्वास उडाला आहे का?” असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. स्थानिक पातळीवर अर्थपूर्ण तडजोडी होतात की काय, अशी शंका या निमित्ताने बळावली आहे.
मंत्रालयातील ‘आका’ पुन्हा सरसावणार?
चर्चा तर अशीही रंगली आहे की, मागील वेळेप्रमाणेच यावेळीही परिवहन विभागातील बडे वस्ताद किरण कुमार आणि मंत्रालयात बसलेले त्यांचे ‘आका’ या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावतील. पुन्हा एकदा फाईली फिरवून, कायद्याला बगल देऊन या गुन्हेगारांना खुर्चीवर बसवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची कुणकुण लागली आहे. भ्रष्टाचाराचा हा लक्कडकोट किल्ला ढासळणार की पुन्हा सेटिंगचे रस्ते मोकळे होणार? ह्यकड़े जनतेचे लक्ष लागले आहे ..



