गडचांदूर : ( विश्लेषण – प्रवीण चिड़े )
यंदाची गडचांदूर नगर परिषद निवडणूक ही साधी निवडणूक नाही… तर थेट ४ हजार कामगारांचा कौल नगराध्यक्षाची गादी ठरवणार अशी ऐतिहासिक लढत म्हणून पाहिली जात आहे. शहरात तब्बल चार प्रमुख सीमेंट उद्योग कार्यरत असल्याने कामगारांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि हीच लोकसंख्या आता निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरणार आहे.
१० प्रभाग – त्यापैकी ६ प्रभाग कामगारबहुल!
गडचांदूर शहरातील एकूण १० प्रभागांपैकी ६ प्रभागांमध्ये सीमेंट कारखान्यातील कामगार कुटुंबांचे स्पष्ट वर्चस्व आहे. अंबुजा सीमेंट, माणिकगड सीमेंट, अल्ट्राटेक सीमेंट आणि डालमिया सीमेंट या उद्योगांमध्ये कार्यरत कामगार मोठ्या संख्येने या प्रभागांत राहतात. त्यामुळे या सहा प्रभागांतील मतदानाची दिशा थेट नगराध्यक्ष पदाचा निकाल ठरवणार आहे.
कामगार वर्गाचा मूड म्हणजे निवडणुकीचा निकाल!
गेल्या काही वर्षांत कामगारांमध्ये वाढती नागरीकरणाची गरज, पाणी व वीजपुरवठ्याचे प्रश्न, रस्त्यांची दयनीय अवस्था, आरोग्य सुविधा, घरकुल योजना आणि शाळा–महाविद्यालयांची अपुरी व्यवस्था हे मुद्दे प्राधान्याने पुढे येत आहेत. कामगार वर्ग कोणत्या पक्षावर किंवा उमेदवारावर विश्वास ठेवणार यावर शहरातील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.
उद्योगांचा आधार – पण शहराकडे दुर्लक्ष?
गडचांदूर शहराच्या अर्थव्यवस्थेला चारही सीमेंट उद्योगांनी मोठा आधार दिला असला तरी शहरातील मूलभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत अशी कामगारांची प्रमुख तक्रार आहे. त्यामुळे यंदा कामगार वर्ग “विकास हवा – आश्वासने नको” या मूडमध्ये असल्याचे दिसते.
राजकीय पक्षांचे तंबू कामगार वसाहतीत!
प्रत्येक निवडणुकीप्रमाणेच यंदाही सर्व पक्षांनी आपली मोर्चेबांधणी कामगार वसाहतीत केंद्रित केली आहे. कारण कामगारांची मतसंख्या इतकी प्रभावी आहे की,
“कामगारांचा कौल मिळवला – म्हणजे निवडणूक जिंकलीच” असा समीकरण सर्वांना मान्य आहे काय हे निवडणूक जस जशी जवळ येईल तेव्हा कळेलच यात शंका नाही ..



