Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeGadchandurघरकुल योजनेच्या नावाखाली कोरपना तालुक्यात रेतीचा ‘महाघोटाळा’!

घरकुल योजनेच्या नावाखाली कोरपना तालुक्यात रेतीचा ‘महाघोटाळा’!

तलाठ्यांचे ‘चांगभलं’, तर महसूल प्रशासनाची तस्करांशी हातमिळवणी; ‘

रेती धोरण २०२५’ कागदावरच! 

भोयगाव/भरोसा
रेती घाटावर गौण खनिजाचे अवैद्य उत्खनन

कोरपना ( गौतम भसारकर गडचांदूर): 
शासनाने घरकुल लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे या उदात्त हेतूने मोफत रेती वाटप योजना सुरू केली. मात्र, कोरपना तालुक्यात या योजनेचा बोजवारा उडाला असून, घरकुलाच्या नावाखाली रेतीची उघड लूट सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे, ते तलाठी भोयगाव-भारोसा व मंडळ अधिकारी नान्दा सोबत तहसील प्रशासनच या लुटीत सामील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

एका टी.पी.वर पाच वेळा उचल; सीसीटीव्ही गायब!

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती कोरपना मार्फत ग्रामपंचायतींना खनिज परवाने (टी.पी.) देण्यात आले आहेत. एका लाभार्थ्याला ५ ब्रास रेती उचलण्याची मर्यादा असताना, तलाठ्यांच्या संगनमताने एकाच टी.पी.वर ४ ते ५ वेळा रेतीची उचल केली जात आहे. रेती घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य असताना, प्रशासनाने जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सीसीटीव्ही नसल्याचा फायदा घेत हजारो ब्रास रेती रात्रीच्या अंधारात गायब केली जात आहे.

प्रशासकीय यंत्रणा की तस्करांचे हस्तक?

या गैरप्रकारात केवळ कनिष्ठ कर्मचारीच नव्हे, तर वरिष्ठ अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
तलाठी व मंडळ अधिकारी यांनी (नान्दा/भोयगाव) रेती घाटावर प्रत्यक्ष देखरेख करण्याऐवजी तस्करांना रान मोकळे करून दिल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

तहसीलदार कोरपना व उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी तालुक्यात रेतीचा काळाबाजार सुरू असताना मौन बाळगले आहे. “महसूल विभाग तस्करांवर मेहरबान” असल्यानेच हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार सुरू असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

 “रेती धोरण २०२५ ला केराची टोपली!”
राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुले यांनी रेती चोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कोरपना तहसीलदारांनी या धोरणाला हरताळ फासल्याचे चित्र आहे. मंत्र्यांच्या आदेशाला थेट आव्हान देण्याचे काम येथील महसूल यंत्रणा करत आहे.

गावागावात रेतीचे डोंगर; लाभार्थी मात्र वंचित!

घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर काढलेली रेती लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता, ती गावागावात साठवून ठेवली जात आहे. हा साठवलेला माल नंतर चढ्या दराने काळ्या बाजारात विकला जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून, गरिबांच्या योजनेवर डल्ला मारला जात आहे.

आता तरी कारवाई होणार का?

कोरपना तालुक्यातील या रेती लुटीची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन रेती घाटांवर तात्काळ सीसीटीव्ही बसवावे , टी.पी. प्रणालीचे ऑडिट करून दोषी तलाठ्यांवर गुन्हे दाखल करावेत, नान्दा व भोयगाव परिसरातील रेती साठ्यांची पंचनामा करून जप्ती करावी. अशी मागणी केल्या जात आहे . जर वेळीच यावर लगाम घातला नाही, तर ‘घरकुल योजना’ ही केवळ रेती तस्करांच्या फायद्याची योजना ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular