प्रविण चिडे | राजुरा तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील विरूर येथे शेतकऱ्यांच्या सुरक्षेला थेट आव्हान देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतकरी दिवाकर झाडे यांच्या आवारातून १२ फेब्रुवारीच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपयांची देखणी व सशक्त बैलजोडी चोरी केल्याने गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवाकर झाडे हे रोजप्रमाणे शेतकाम आटोपून बैलांना घराच्या आवारात बांधून ठेवत. मात्र पहाटे उठून पाहिले असता बैलजोडी गायब असल्याचे दिसून आले. परिसरात शोध घेतला असता एक बैल गावातच गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याचा साज काढण्यात आलेला होता तसेच धारदार वस्तूने टोचल्यामुळे त्याच्या अंगावर जखमा होऊन रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
प्राथमिक अंदाजानुसार चोरट्यांनी दोन्ही बैल गाडीत टाकून नेण्याचा प्रयत्न केला. एक बैल गाडीत चढवण्यात यश आले, मात्र दुसरा बैल प्रतिकार करत खाली पडला आणि गावात परत आला. त्यामुळे एक बैल चोरट्यांच्या ताब्यात गेला असून दुसरा गंभीर जखमी अवस्थेत सापडला.
ही घटना केवळ चोरीची नसून ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीचे लक्षण असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. रात्रीच्या वेळी गावात कोणतीही गस्त नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “शेतकऱ्यांच्या कष्टाच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी नाही का?” असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दिवाकर झाडे हे या घटनेमुळे आर्थिकदृष्ट्या कोलमडले असून मानसिक धक्क्यात आहेत. बैलजोडी ही त्यांच्या शेतीची मुख्य आधारस्तंभ होती. अशा घटना वारंवार घडत असताना पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे.
ग्रामस्थांची जिल्ह्या पोलीस प्रशासन विनंती
- तातडीने गुन्हा दाखल करून विशेष तपास पथक नेमावे
- रात्रीची पोलीस गस्त वाढवावी
- गावांमध्ये सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा उभारावी
- शेती उपयोगी वस्तु जैसे कि स्प्रे पंप – स्प्रिंकल पाइप – मोटर जेट पंप – सोलार प्लेट इत्यादिचे संरक्षणासाठी स्वतंत्र उपाययोजना कराव्यात
ही घटना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार विरुर पोलीस स्टेशन क्षेत्रात , रेशन तांदूळ – सुगंधित तंबाखू – मोहफूल दारू – रेती तस्करी इत्यादि व्यवसाय करणारे स्टेशन ला आर्थिक रसद देतात आणि त्यामुळे ह्या परिसरात दिवशेन दिवस अश्या घटना वाढत आहे . आता पोलिस प्रशासन जागे होऊन चोरट्यांच्या मुसक्या आवळते का, की आणखी एखाद्या मोठ्या घटनेची वाट पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



