राजुरा तालुका प्रतिनिधी ( प्रविण चिडे विरुर )
राजुरा तालुक्यातील बल्लारशा–सिकंदराबाद डाऊन रेल्वे लाईनवर पहाटे चार वाजताच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. रेल्वे रूळ ओलांडताना एका सात वर्षांच्या वाघिणीचा रेल्वेच्या धडकेमुळे मृत्यू झाला. पहाटे गार्ड आणि स्थानिक कर्मचाऱ्यांना वाघिणीचा मृतदेह दिसताच माहिती वनविभागाला देण्यात आली.

घटनास्थळी हॅलो पेट्रोलिंग पथकासह वनाधिकाऱ्यांनी धाव घेतली. प्राथमिक चौकशीदरम्यान वाघिणीचे दात, नखांसह सर्व अवयव साबुत असल्याचे आढळले. मृतदेह डाऊन लाईनच्या उजव्या बाजूला सापडला असून मृत्यू हा पूर्णपणे रेल्वे धडकेमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
माननीय एम. बी. गिरटकर — उपविभागीय वन अधिकारी, राजुरा आणि माननीय जी. आर. इंगळे — वनपरिक्षेत्र अधिकारी, राजुरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाघिणीचा मृतदेह चंद्रपूर टीटीसी येथे पोस्टमार्टेमसाठी रवाना करण्यात आला.
वनविभागाकडून पुढील तपास सुरू असून रेल्वे मार्गावरील वन्यप्राणी मृत्यू टाळण्यासाठी अधिक उपाययोजना करण्याची स्थानिकांमध्ये मागणी होत आहे.



