Monday, April 20, 2026
Google search engine
Homeविरूर स्टेशनविरूरमधून बैल चोरीचा धक्कादायक प्रकार; शेतकरी दिवाकर झाडे चिंतेत

विरूरमधून बैल चोरीचा धक्कादायक प्रकार; शेतकरी दिवाकर झाडे चिंतेत

 

प्रविण चिडे तालुका प्रतिनिधी
विरुर

विरूर येथून शेतकऱ्याची मौल्यवान बैलजोडी चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विरुर येथील शेतकरी दिवाकर झाडे यांच्या आवारात बांधून असलेली देखणी बैलजोडी दि. 12 फेब्रुवारीच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
दिवाकर झाडे हे नेहमीप्रमाणे दिवसभर आपल्या बैलजोडीच्या सहाय्याने शेतकाम करून सायंकाळी बैलांना आपल्या घराच्या आवारात बांधून ठेवत. मात्र 12 फेब्रुवारी रोजी पहाटे उठून पाहिले असता बैलजोडी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ परिसरात शोधाशोध सुरू केली असता एक बैल गावातच आढळून आला.
या बैलाचा संपूर्ण साज काढलेला होता तसेच तुतारीसारख्या धारदार वस्तूने टोचल्याने त्याला गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. रक्तस्राव झालेल्या अवस्थेत तो बैल गावात शेजाऱ्याच्या जनावरासोबत बसून असलेला आढळला. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी दोन्ही बैल गाडीत टाकून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र एक बैल गाडीत चढला, तर दुसरा बैल गाडीत चढला नसल्याने तो खाली पडत गावात परत आला. मात्र दुसरा बैल चोरटे गाडीत टाकून घेऊन जाण्यात यशस्वी झाले.
ही बैलजोड अत्यंत देखणी व सशक्त असून सुमारे एक लाख रुपयांची किंमत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या किमतीची बैलजोडी गावातून चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी दिवाकर झाडे हे या घटनेमुळे आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.
सध्या गावात एकच चर्चा असून पोलीस विभागाने तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular