नागपूर जिल्हा प्रतिनिधि :- नागपूर जिल्हा इंटक कमिटीची महत्त्वपूर्ण सभा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघ, नागपूर येथे कार्याध्यक्ष श्री. सुरेंद्र टिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत श्रमिक हक्क, रोजगार सुरक्षा आणि कामगार संघटनांच्या बळकटीकरणासंदर्भात तीन महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले.
- सभेत केंद्र सरकारच्या चार लेबर कोड रद्द करण्याची, महाराष्ट्र शासनाने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची, तसेच शासनाने लागू केलेल्या १२ तास कामकाजाच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध करून तो तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच मोठ्या प्रमाणात सुरू असलेले खाजगीकरण व कंत्राटी पद्धत थांबवून युवकांना स्थायी रोजगार देण्याची, असंघटित कामगारांना किमान वेतनासह वैद्यकीय सुविधा व पी.एफ. नियमित जमा करण्याची मागणी संघटनेने जोरदारपणे उपस्थित केली.
या मागण्यांसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी “धरणे आंदोलन” छेडण्याचा आणि डिसेंबर महिन्यात भव्य इंटक कामगार मेळावा आयोजित करून कामगारांना संघटित करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच इंटक ही काँग्रेसशी संलग्न संघटना असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ५% उमेदवारी इंटक प्रतिनिधींना देण्यात यावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष यांच्याकडे मागणी करण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सभेत प्रास्ताविक भाषण अॅड. सुभाष इंगळे यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश इंटकचे उपाध्यक्ष श्री. तुकाराम डेकाटे, संघटन मंत्री रंजन नलोडे, उपाध्यक्ष दादाराव डोंगरे, डिफेन्स संघटनेचे नेते अरविंद सिंग, श्री. प्रवीण महल्ले, रेल्वे संघटनेचे नेते बंडू रंधाई, माथाडी संघटनेचे नेते यादव व जी. एस. आय संघटनेचे नेते श्री. रेवतकर यांनी सभेला मार्गदर्शन केले.
सभेला प्रवीण तंत्रपाळे, अभिजित सोनवणे, अरुण तुर्केल, दत्ता डहाके, पुरुषोत्तम कैकाडे, अॅड. कांबळे, गाणार आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.



