प्रवीण चिड़े तालुका प्रतिनिधि राजुरा
राजुरा विधानसभा क्षेत्रातील बोगस मतदार समाविष्ट करण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून या प्रकरणाने निवडणूक आयोगाची धांदल उडविली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा प्रश्न देशपातळीवर मांडताच आयोगावर संशयाची सावली गडद झाली आहे. “निवडणूक आयोग भाजपसाठी वोट चोरी करत आहे” अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे.

*याच पार्श्वभूमीवर माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. सुभाष धोटे यांनी सरळ प्रश्न विचारला* *बोगस मतदारांची नावे कोणी समाविष्ट केली*? *मुख्य सूत्रधार कोण*?” मात्र आयोगाने दोषींवर थेट कारवाई करण्याऐवजी राजुरा विधानसभा क्षेत्रातील शिक्षक बीएलओंवर प्रचंड जबाबदारी ढकलली आहे.
आयोगाने बीएलओंना सरळ आदेश दिला आहे – सन 2002 ची मतदार यादी हातात घ्या आणि 2024 च्या यादीशी तुलना करा. यातून कोणती नावे वगळली, कोणती नावे नवीन समाविष्ट झाली आणि किती नावे दुबार दाखल केली गेली याचा संपूर्ण अहवाल युद्धस्तरावर तयार करा. इतक्या प्रचंड कामाच्या ओझ्यामुळे आधीच ताणाखाली असलेल्या शिक्षक बीएलओंची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
काही बीएलओंनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “दोषींवर कारवाई करण्याऐवजी आमच्यावरच तपासाचा डोंगर टाकला गेला आहे. आयोग बोगस मतदार तयार करणाऱ्यांचे नाव का उघड करत नाही?” त्याचबरोबर राजुऱ्याचे एसडीओ स्वतः यादी तपासणीसाठी BLOंवर दबाव टाकत असल्याचीही चर्चा आहे.
मुळात जर बोगस नावे समाविष्ट झाली असतील, तर त्यामागे काही अधिकारी, राजकीय दबाव वा स्थानिक दलालांचे खेळ असणार हे उघड गुपित आहे. परंतु आयोग याकडे दुर्लक्ष करून मूळ दोषींना सोडून देत आहे आणि निष्पाप शिक्षक BLOंवर कारवाईसारखा वागणूक देत आहे, असा रोष शिक्षकांमध्ये आहे.
आता जनतेतूनही आवाज उठू लागला आहे की, “बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्यांचे नाव लवकरात लवकर उघड केले पाहिजे. जबाबदारांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. अन्यथा या तपासणीचा काही उपयोग नाही.”
एकीकडे लोकशाहीला मूलभूत आधार देणारी मतदार यादीच जर संशयास्पद ठरत असेल, तर निवडणुकीचा संपूर्ण प्रक्रियेवरील विश्वास धोक्यात येतो. म्हणूनच बोगस मतदारांचा मुद्दा हा आता केवळ प्रशासकीय न राहता लोकशाहीच्या भवितव्याशी जोडला गेला आहे.
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 2002 व 2024 च्या मतदार यादीतील दुबार नावे व वेगळलेली नावे व नवीन समाविष्ट नावे याबाबत संपूर्ण माहिती एका क्लिकवर अगदी सहज मिळविता येते परंतु असे न करता BLO कडून एक एक नावाचा शोध घ्या संपूर्ण याद्या पडताळणी करा असा फर्मान निवडणूक आयोगाने दिला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्यांचे नाव उघड करण्याऐवजी निवडणूक आयोग जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करीत आहे. निवडणूक आयोगाने राजुरा विधानसभा क्षेत्रात बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्यांचे नाव तात्काळ उघड करावे अशी आमची मागणी आहे. कोरपना, राजुरा व जीवती हे अतिदुर्गम तालुके आहेत तेथील शिक्षकांना शिक्षकांचे काम करू द्या त्यांच्यावर उगाच ताण टाकू नका ह्या आशयाचे पत्र माजी ग्राम पंचायत सदस्य अभय मुणोत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. निवडणूक आयोग पुढे काय एक्शन घेतो ह्यकडे मतदार संघातील जनतेचे लक्ष्य लागले आहे .



