पिंपरी-चिंचवड: ( पुणे )
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपो येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ निष्पाप कामगारांच्या वारसांना मनपात कायमस्वरूपी नोकरी आणि कायदेशीर नुकसान भरपाई देण्याची आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.
आयुक्तांचे अपयश आणि ढिसाळ कारभार
डॉ. कैलास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत ९ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेच्या कचरा वर्गीकरणावरील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान घेतली आहे.
पत्रात थेट आरोप करण्यात आला आहे की, या दुर्घटनेनंतर बचाव कार्य करण्यात पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने अत्याधुनिक मशिनरी मागवून बचाव कार्य सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे न करता केवळ अपुऱ्या मनुष्यबळावर आणि कमी क्षमतेच्या मशिनरीवर दुर्घटनेनंतरचे महत्त्वाचे २४ तास घालवले. यामुळे अनधिकृत इमारतीत अडकून पडलेले ९ कामगार मृत्युमुखी पडले. प्रथमदर्शनी या घटनेत आयुक्त डॉ. सूर्यवंशी हे बचाव कार्याबाबत तातडीने योग्य निर्णय घेण्यास कमी पडल्याचे दिसत आहे.
नागपूर दुर्घटनेच्या धर्तीवर नुकसान भरपाईची मागणी
इंटकने या पत्रात नागपूर येथील दारूगोळा फॅक्टरीमधील अपघाताचा दाखला दिला आहे. नागपूर दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांना शासनाने प्रत्येकी ८२ लाख रुपये आणि जखमींना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. याच धर्तीवर मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबांनाही योग्य व कायदेशीर आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळावी, अशी मागणी डॉ. कदम यांनी केली आहे.
“बचाव कार्यात अपयशी ठरलेले मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना तात्काळ बडतर्फ करावे, ही संपूर्ण कामगार संघटनेची आग्रही मागणी आहे.”
डॉ. कैलास महादेव कदम (अध्यक्ष, इंटक महाराष्ट्र)



