Tuesday, June 2, 2026
Google search engine
HomeChandrapurराजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; नागरिकांमधून तीव्र संताप

राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; नागरिकांमधून तीव्र संताप

राजुरा:चंद्रपुर 
राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतरच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच येथील प्रशासकीय यंत्रणेची प्रतिमा एवढी डागाळली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि भूमापन कार्यालय सध्या दलालांच्या विळख्यात अडकले असून, सामान्य नागरिकांची मोठी आर्थिक लूट व सतावणूक होत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे.

🔴 सामान्य नागरिकांची कोंडी

मिळालेल्या माहितीनुसार, जमीन महसूल, फेरफारची प्रकरणे, भूसंपादन होणाऱ्या जमिनीचे फेरफार व मोजणी, तसेच भोगवटा क्रमांक २ चे वर्ग-१ मध्ये रूपांतर करणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण कामांसाठी नागरिकांना थेट दलालांचाच आश्रय घ्यावा लागत आहे. दलालांच्या मध्यस्थीशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकत नसल्याने, महायु सरकारच्या काळातील या कारभाराबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

🔴 उपविभागीय अधिकाऱ्यांची वादग्रस्त कारकीर्द आणि मुख्यालयी राहण्याचा प्रश्न

या कार्यालयाचे वरिष्ठ उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. कुसुंबी येथील आदिवासी बांधव गेल्या दहा वर्षांपासून माणिकगड सिमेंट प्रशासनाविरुद्ध आपल्या जमिनीच्या हक्कासाठी लढा देत आहेत. असे असताना, उपविभागीय अधिकारी माने हे रुजू झाल्यापासून ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत चक्क त्याच ‘माणिकगड सिमेंट’च्या व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होते, वर्तमान पत्रात वृत्त प्रकाशित झाल्यावर ते मुख्यालयी परत गेले हे विशेष .

शासकीय नुकसान:

शासनाने लाखो रुपये खर्च करून उपविभागीय अधिकाऱ्यांसाठी भव्य बंगला बांधला असतानाही, साहेब मुख्यालयापासून २५ किलोमीटर दूर वास्तव्यास होते.
त्यांना आणण्या-सोडण्यासाठी रोज शासकीय गाडीचे किमान १०० किलोमीटरचे फेरफटके होत होते, ज्यामुळे शासकीय इंधनाची मोठी उधळपट्टी झाली. जे अधिकारी इतरांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देतात, तेच स्वतः नियमांचे उल्लंघन करत असल्याने प्रशासकीय शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजुरा-गड़चांदुर अश्या अतिरिक्त झालेल्या वाहनाच्या फेऱ्या आणि त्यावर झालेला इंधन खर्च उपविभागीय अधिकारी  यांचे कडून वसूल करणार का हा मोठा प्रश्न आहे .

🔴 ‘त्या’ बड्या बाबूची मध्यस्थी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण गैरप्रकारात उपविभागीय कार्यालयातील एक ‘बडे बाबू’ मुख्य सूत्रधार म्हणून काम करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे येणारी ‘आर्थिक माया’ गोळा करण्याची आणि गैरप्रकारांना वाव देण्याची जबाबदारी या बाबूने स्वीकारल्याची चर्चा वर्तुळात आहे. प्रशासनाने जर या कर्मचाऱ्याची आणि कार्यालयाची निष्पक्ष चौकशी केली, तर अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. या बाबूचा राजुरा कार्यालयातील सेवाकाळ संपला असताना बदली थांबविन्यासाठी तो दरवर्षी सेटिंग करत असतो अशी माहिती सूत्राकड़ून मिळाली आहे .

🔴 गौरवशाली परंपरेला लागला डाग !
राजुरा मतदारसंघाला एक मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे. कै. रामचंद्रजी धोटे, कै. प्रभाकररावजी मामुलकर, कै. विठ्ठलरावजी धोटे, माजी आमदार वामनरावजी चटप, माजी आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार संजय धोटे यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी या क्षेत्राच्या विकासासाठी आणि प्रशासकीय प्रतिष्ठेसाठी जीवाचे रान केले. त्यांच्या काळात प्रशासनाचा एक धाक आणि आदर होता. मात्र, आजची दलालांची राजवट पाहता या गौरवशाली परंपरेला डाग लागत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.
या मस्तवाल अधिकाऱ्या विरुद्ध विद्यमान आमदार महोदयांनी कड़क पावले उचलावी अशी भावना राजुरा तालुका वाशी जनतेने व्यक्त केली आहे .

उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन, दलालांचा सुळसुळाट थांबवावा आणि संबंधित वादग्रस्त अधिकाऱ्यांची व बड़े बाबूची चौकशी करून राजुरा कार्यालयाला पूर्ववत प्रतिष्ठा मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी आता राजुऱ्यातील बुद्धीजीवी आणि त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular