Tuesday, June 2, 2026
Google search engine
HomeGadchandurगडचांदूर महावितरणचा भोंगळ कारभार: उपविभागीय अभियंता मुख्यालयी गैरहजर; कर्मचारी निर्धास्त, सुयोग नगरवासीय...

गडचांदूर महावितरणचा भोंगळ कारभार: उपविभागीय अभियंता मुख्यालयी गैरहजर; कर्मचारी निर्धास्त, सुयोग नगरवासीय रात्रभर अंधारात !

गडचांदूर:
गडचांदूर महावितरण उपविभागाचा कारभार कमालीचा रसातळाला गेला असून, येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. उपविभागीय अभियंता स्वतः मुख्यालयी राहत नसल्याने संपूर्ण कार्यालयावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जणू नागरिकांच्या समस्यांचे काही ‘सोयरसुतक’ उरलेले नाही, अशी तीव्र संतापजनक स्थिती निर्माण झाली आहे.
काल रात्री सुयोग नगर परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कमालीचा निष्काळजीपणा समोर आला. विजेच्या जिवंत तारा एकमेकांत अडकून पडल्या होत्या, मात्र कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना ही गंभीर बाब दिसलीच नाही की त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला? असा सवाल उपस्थित होत आहे. या अत्यंत धोकादायक आणि निष्काळजी कारभारामुळे सुयोग नगरमधील रहिवाशांना रात्री २ वाजल्यापासून प्रचंड उकाड्यात, अंधारात रात्र काढावी लागली.

अनुभवी कर्मचाऱ्यांची वानवा;

१० वर्षांतील सर्वात वाईट स्थिती
सध्याच्या घडीला गडचांदूर महावितरणमध्ये गुणवत्तापूर्ण आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता जाणवत आहे. चालू उन्हाळ्यात नागरिकांना ज्या भीषण वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे, तशी परिस्थिती गेल्या १० वर्षांत कधीही निर्माण झाली नव्हती. या संपूर्ण दशकात यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक वेळा विद्युत पुरवठा खंडित (विद्युत गोल) होण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. उन्हाच्या तीव्र चटक्यांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि आजारी रुग्णांचे हाल बेहाल होत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा हक्क अधिनियमा’चे उल्लंघन;
कारवाईची मागणी

महाराष्ट्र शासनाने नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी ‘महाराष्ट्र नागरी सेवा हक्क अधिनियम’ (सेवा हमी कायदा) लागू केला आहे. मात्र, गडचांदूरचे उपविभागीय अधिकारी या कायद्याला पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यालयी हजर न राहणे, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण न करणे आणि सेवांमध्ये सातत्याने कसूर करणे, हा थेट सेवा हमी कायद्याचा भंग आहे.
त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि मुख्यालयी गैरहजर राहणाऱ्या या उपविभागीय अधिकाऱ्याविरुद्ध तसेच निष्काळजी कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ कडक शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता सुयोग नगरमधील रहिवाशांसह संपूर्ण गडचांदूर परिसरातून जोर धरत आहे. वरिष्ठ प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular