चंद्रपूर: ( विजय ठाकरे )
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात आज शुक्रवारी (२२ मे) सकाळच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी घटना घडली आहे. जंगलात तेंदू पत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या एकाच गावातील चार महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. या थरारक घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आणि विशेषतः सिंदेवाही परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही रेंजमधील गुंजेवाही येथील काही महिला आज नेहमीप्रमाणे पहाटे ६ ते ७ वाजताच्या सुमारास गुंजेवाही गावाजवळील जंगल परिसरात तेंदू पत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सर्व महिला जंगलात आपापल्या कामात व्यस्त असताना, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. वाघाचा हा हल्ला इतका भीषण होता की, यामध्ये चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) कवडाबाई दादाजी मोहुरले (वय ४५ वर्षे, रा. गुंजेवाही)
२) अनिताबाई दादाजी मोहुरले (वय ४० वर्षे, रा. गुंजेवाही)
३) सुनीता कौशिक मोहुरले (वय ३८ वर्षे, रा. गुंजेवाही)
४) संगीता संतोष चौधरी (वय ५० वर्षे, रा. गुंजेवाही)
### गावात एकच आक्रोश, वनविभागाविरोधात संताप
एकाच गावातील चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गुंजेवाही गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतकांमध्ये एकाच कुटुंबातील महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत असल्याने गावात एकच आक्रोश पाहायला मिळत आहे.
सध्या तेंदू पत्ता संकलनाचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने जंगलाकडे जात आहेत. मात्र, वन्यजीवांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासकीय आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले असून, संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि पीडित कुटुंबांना तात्काळ शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ही प्राथमिक अधिकृत माहिती मनिकन्द रामानुज फारेस्ट चीफ यांनी दिली आहे



