कवठाला / चंद्रपुर : गौतम भासरकर
एकीकडे शासकीय पातळीवर कोट्यवधी रुपये खर्च करून “वृक्षवल्ली” फुलवण्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात एका औद्योगिक प्रकल्पासाठी निसर्गाची कत्तल केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोणसरी ते घुग्घूस दरम्यान लोयड्स मेटल प्रकल्पासाठी टाकण्यात येत असलेल्या आयर्न स्लरी पाईपलाईनच्या कामात कवठाला-भोयेगाव ते धानोरा फाटा या मार्गावरील हजारो झाडे पोकलेन आणि जेसीबी मशीन चालवून जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या संपूर्ण विनाशावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गड़चांदुर शाखेचे उप विभागीय अभियंता अन्य जबाबदार अधिकाऱ्यांची ‘मूक संमती’ असल्याचा थेट आरोप होत आहे.
सात वर्षांची मेहनत अवघ्या काही तासांत मातीत!
भोयेगाव ते धानोरा फाटा या मार्गाच्या दुतर्फा सुमारे सात वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली होती. नियमित टँकरद्वारे पाणी देऊन या झाडांचे अत्यंत मेहनतीने संगोपन करण्यात आले. सात वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही झाडे आज १५ ते २० फूट उंच आणि डेरेदार झाली होती. मात्र, पाईपलाईनच्या नाली खोदकामासाठी कोणत्याही पर्यावरणीय नियमांची पर्वा न करता पोकलेनच्या साह्याने ही झाडे मुळासकट उखडून फेकून दिली जात आहेत. सात वर्षे जपलेला हिरवागार वारसा अवघ्या काही तासांत निष्क्रीय प्रशासनामुळे उद्ध्वस्त झाला आहे.
पीडब्ल्यूडीचे नाहरकत आणि उपविभागीय अभियंता गड़चांदुर शाखा यांची भूमिका संशयास्पद?
या पाईपलाईनच्या खोदकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूरने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. या कामावर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी गडचांदूरचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे होती अशी माहिती सूत्राकड़ून प्राप्त झाली .
धक्कादायक बाब म्हणजे, अभियंता महोदय हे दररोज याच मार्गाने गडचांदूर येथे ये-जा करतात. स्वतःच्या डोळ्यांसमोर हजारो झाडांची कत्तल होत असताना आणि पोकलेन मशीन रस्त्याच्या दुतर्फा तांडव घालत असताना, त्यांनी एकदाही हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे हजारो झाडे तोडताना शाखा अभियंता मूकमूक संमती देऊन गप्प का राहिले? असा संतप्त सवाल आता नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.
नियम धाब्यावर; पर्यायी मार्गाची पायमल्ली
प्रकल्पाचे काम करताना झाडे वाचवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधणे किंवा झाडांचे पुनरोपण करणे बंधनकारक असते. मात्र, लोयड्स मेटलच्या या पाईपलाईन कामात सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत.
पीडब्लूडी विभागाचे दुर्लक्ष आणि कंत्राटदाराची मनमानी यांमुळेच हा निसर्गाचा महासंहार घडून आल्याचा आरोप केला जात आहे.
कारवाईची जोरदार मागणी:
शासकीय निधी आणि मेहनतीने लहानाची मोठी झालेली झाडे पोकलेन चालवून तोडणाऱ्या दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि डोळेझाक करणारे सार्वजनिक बांधकाम उप विभागीय अभियंता गड़चांदुर शाखा यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.



