वणी: { शफी शेख )
तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी या मागणीसाठी युवासेनेने दिलेल्या निवेदनाची महसूल प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशान्वये घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्याचे पत्र तहसीलदार वणी यांनी निर्गमित केले असून, यामुळे हजारो गरिबांच्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल
युवा सेना विधानसभा समन्वयक (वणी, मारेगाव, झरी) आयुष रोहीदास ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२६ रोजी प्रशासनाला निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत, जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी १३ जानेवारी रोजी वणी तालुक्यातील वाळू घाटातून घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्यास मंजुरी दिली.
प्रशासनाचे आश्वासन
तहसीलदारांनी दिलेल्या अधिकृत पत्रात नमूद केले आहे की, सध्या यवतमाळ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी सामूहिक रजा आंदोलनावर आहेत. हे कर्मचारी कर्तव्यावर परतताच घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली जाईल. मागणी मान्य झाल्यामुळे युवासेनेने आपले प्रस्तावित आंदोलन मागे घ्यावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पत्राद्वारे करण्यात आले आहे.
आयुष ठाकरे यांनी मानले आभार
प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल आणि गरिबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल युवा सेना समन्वयक आयुष ठाकरे यांनी तहसीलदार वणी यांचे आभार मानले आहेत. “हा केवळ युवासेनेचा विजय नसून तालुक्यातील प्रत्येक घरकुल लाभार्थ्याचा विजय आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



