चंद्रपूर :
( गौतम भसारकर जिल्हा विश्लेषक श्रमिक मंथन )
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आज चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाशी अटळपणे जोडले जाते. कार्यकौशल्य, संघटनशक्ती, स्पष्ट विचारसरणी आणि विजनरी दृष्टी यांच्या जोरावर त्यांनी जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी दिशा दिली आहे.
कार्यकौशल्य आणि विकासाचा ठसा
अल्पावधीतच पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका मिळवत विधानसभेत वारंवार विजय मिळवणे हे त्यांच्या संघटनशक्तीचे उत्तम उदाहरण आहे. अर्थमंत्रीपदावर असताना शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख अर्थसंकल्प त्यांनी सादर केले, तर वनमंत्रीपदावर असताना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक ओळख मिळवून दिली. शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगार या क्षेत्रांत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात कामांची नवी दिशा दिली.
जनतेशी घट्ट नाळ
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये, तांत्रिक शिक्षण संस्था, औद्योगिक प्रकल्प आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमुळे मुनगंटीवार हे जिल्ह्याच्या जनतेसाठी विकासाचे प्रतिक ठरले. त्यांनी एपीजे अब्दुल कलाम गार्डन, इको-पार्क, बोटनिकल गार्डन, आधुनिक बसस्थानके, पोलीस स्टेशन व पोलीस आवास यांसारखी कामे पूर्ण करून जिल्ह्याच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला आहे.
पक्षातील कुरघोडीचे राजकारण
मुनगंटीवार यांच्या मजबूत संघटनशक्तीमुळे आणि लोकप्रियतेमुळे काही विरोधकांनी त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. भाजपातील दुसरा गट नेहमीच त्यांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात असतो. मात्र, नेतृत्वावर दबाव आणण्याचे, स्थानिक पातळीवर विरोध उभा करण्याचे हे डाव जिल्ह्यात निष्फळ ठरले आहेत. जनतेशी असलेली नाळ आणि कार्यकर्त्यांचा विश्वास यामुळे त्यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे.
मुनगंटीवार विरुद्ध दुसरा गट
सध्या भाजपात दुसऱ्या गटाने जोरगेवार यांना पुढे करून मुनगंटीवार यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. पण चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण हे “सुधीरभाऊ” केंद्रितच राहिले आहे. विकासकामांचा ठसा आणि संघटनशक्ती या आधारावर त्यांना आव्हान देणे सोपे नाही. स्थानिक पातळीवरील कुरघोडी कितीही झाली, तरी जिल्ह्यातील जनता मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवते.
*जनतेचा आमदार*आज चंद्रपूरच्या विकासाची चर्चा झाली की सुधीर मुनगंटीवार हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या विजनरी दृष्टिकोनामुळे जिल्ह्याला नवे रूप मिळाले आहे. भाजपातील दुसऱ्या गटाचे प्रयत्न फोल ठरत असून, मुनगंटीवार यांची लोकप्रियता आणि कार्याचा ठसा यामुळे ते जिल्ह्यातील “जॉइंट किलर” नेते म्हणून उभे राहिले आहेत



