राजुरा तालुका प्रतिनिधि ( प्रवीण चिड़े )
राजुरा : दिव्यांगत्व ही अडचण असली तरी ती कधीच जीवनाचा अडथळा ठरू नये, यासाठी समाजाने पुढाकार घेतल्यास अनेक जिवनांना नवी दिशा मिळते. याच भावनेतून पंचायत समिती राजुरा व जिल्हा परिषदेच्या समग्र समावेशित शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने गटसाधन केंद्र राजुरा येथे १६ सप्टेंबर रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सहायक साधनांचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत २२ विद्यार्थ्यांना व्हिलचेअर, सी. पी. चेअर, इलेक्ट्रिक बॅटरी गाडी, श्रवणयंत्र, रोलेटर तसेच शैक्षणिक किट देण्यात आले. या साधनांमुळे अनेक मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रवास अधिक सोपा व सुलभ होणार आहे. पालकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटलेले दिसत होते, तर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान त्यांच्या आयुष्यातील या क्षणाचे महत्व अधोरेखित करत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी सौ. मंगला तोडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षण प्रवासाला बळकटी देण्याचे आश्वासन दिले आणि पालकांना साधनांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विस्तार अधिकारी श्रावणकुमार चालकुरे, शिक्षण विस्तार अधिकारी विशाल शिंपी, सचिन मालवी, आशिष बहादुरे, देवेंद्र राहगंडाले, गणेश राखळे, दिवाकर चाचरकर, मंगला सोमलकर, मनीषा वांदिले, सीमा समर्थ, उत्तम देवकते तसेच गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
ही वाटपाची साधने केवळ दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन आयुष्य सुलभ करणारी नाहीत, तर त्यांना आत्मविश्वास देणारी, शिक्षणाच्या मार्गावर नवा उजेड पसरवणारी ठरली आहेत. समाजाची खरी प्रगती म्हणजे अशा घटकांना हात देणे, जे मागे राहण्याच्या स्थितीत असतात. राजुरामध्ये झालेला हा उपक्रम त्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे.



