सोलापूर, दि. १६ सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्रातील सुमारे चार लाख विडी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी नव महाराष्ट्र वीडी कामगार व कर्मचारी संघटना, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने वारंवार मागणी आणि पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार, महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय, मुंबई येथे आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीदरम्यान मंत्री महोदयांनी दिवाळीनंतर पुन्हा बैठक घेऊन किमान वेतनाबाबत सक्षम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. विडी कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सायबन्ना तेग्गळी यांनी प्रदीर्घ काळापासून असंघटित कामगारांसाठी सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये संघर्ष केला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत नव्या पिढीत नेतृत्व करणारे मिलिंद गायकवाड अण्णा यांचे कार्यही कौतुकास्पद ठरत आहे. अ-संघटित क्षेत्रातील गोरगरीब आणि कष्टकरी वर्गासाठी दिवसरात्र अण्णांसोबत मिलिंद गायकवाड ही जोडी लढत असल्याने कामगार क्षेत्रात नवी ऊर्जा आणि आशावाद निर्माण झाला आहे.
या बैठकीस माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, सायबन्ना तेग्गळी, विष्णू कारमपुरी यांच्यासह जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कामगार विभागाचे प्रधान सचिव कुंदन मॅडम, उपसचिव दीपक पोकळे, स्वप्निल कापडणीस, कामगार आयुक्त तुम्मोड साहेब, अप्पर कामगार आयुक्त वाघ साहेब, आणि सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी सहभाग नोंदवला.
विडी कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार लवकरच ठोस पावले उचलेल, अशी अपेक्षा कामगार वर्गातून व्यक्त केली जात आहे.



