गड़चांदुर ( गौतम भसारकर )
कोरपना तालुक्यातील कवठाळा येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर शाखा कवठाळा यांच्या वतीने शेतकरी सहकारनिष्ठ चारचाकी वाहन कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. दि. 5 जानेवारी रोजी बँकेच्या संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयानुसार आयोजित या कार्यक्रमात विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते एकूण 22 लाख 05 हजार रुपयांच्या वाहनांचे वितरण करण्यात आले.
या योजनेअंतर्गत तळोधी येथील शेतकरी ज्ञानेश्वर दत्तूजी लखमापूरे यांना बोलेरो पिकअप वाहनासाठी 8 लाख 72 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून वाहन व चावी प्रदान करण्यात आली. तसेच साखरी येथील युवा शेतकरी अमोल महादेव अडबाले यांना स्कॉर्पिओ वाहनासाठी 13 लाख 33 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून वाहनाच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सहकारी बँकेच्या विविध योजना शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. सहकारी बँक शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून अशा योजनांमुळे ग्रामीण भागाचा विकास साध्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास विभागीय अधिकारी श्री. बी. एल. जोगी, कोरपना पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर नैताम, कवठाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश सातपुते, येथील प्रतिष्ठित नागरिक मधुकर निब्रड, निलेश निखाडे, मिननाथ पा. बोबडे, प्रदीप राऊत, वसंता बतखल, सुनील खारकर, शाखाधिकारी नगराळे, निरीक्षक पाचभाई तसेच बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
माजी आमदार निमकर यांनी शाखेस दिलेल्या प्रथम भेटीनिमित्त शाखाधिकारी नगराळे व कर्मचारीवर्गाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



