श्रमिक मंथन’च्या बातमीने प्रशासनाला जाग; अधिकारी व पंप चालकांचे संगनमत उघड ?
गडचांदूर:
‘श्रमिक मंथन’ने गडचांदूर येथील ‘महेंद्रा पेट्रोलियम’ (महेंद्रा पेट्रोल पंप, थुट्रा) च्या डिझेल आणि पेट्रोल हेरफेरीची बातमी प्रकाशित करताच अखेर सुस्त प्रशासनाला जाग आली आहे. अमरदीप कोल सर्व्हिसने सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी असलेला हा पेट्रोल पंप चक्क स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी ‘खाजगी पंप’ असल्यासारखा चालवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
सर्वसामान्यांना रांगा, तर बड्या कंपन्यांना थेट पुरवठा
देशात निर्माण झालेल्या कथित इंधन टंचाईचा गैरफायदा घेत या पंपावर मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचा आरोप होत आहे. आज सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी केवळ ३० लीटर डिझेलसाठी तासन्तास उन्हातान्हात रांगेत उभे राहत आहेत. मात्र, दुसरीकडे एसीएस (ACS) ट्रान्सपोर्ट कंपनीला जनतेच्या हक्काचे इंधन छुप्या मार्गाने थेट पुरवले जात आहे. व्यावसायिक वापरासाठी डिझेलचे दर प्रतिलीटर १४७ रुपये असताना, सर्वसामान्यांसाठी आजचा अधिकृत दर ९८.९० रुपये आहे. या दरातील फरकाचा गैरफायदा घेऊन नफेखोरी केली जात असल्याचे चित्र आहे.
छायाचित्रातून उघड झालेली धक्कादायक आकडेवारी प्राप्त
या पंपावर लावलेले अधिकृत फलक स्पष्टपणे दिसत आहेत. दिनांक २९/०५/२०२६ रोजीच्या या फलकांवरील आकडेवारी अत्यंत संशयास्पद आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे:
पेट्रोलची उपलब्धता:
फलकावर पेट्रोलचा स्टॉक २५४६ लीटर आणि दर ११२.२० रुपये दाखवला आहे. परंतु, प्रत्यक्षात गेल्या ५ महिन्यांपासून सामान्य जनतेला येथे पेट्रोलचा एक थेंबही मिळालेला नाही, असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. जर ५ महिन्यांपासून पेट्रोल नाही, तर मग बोर्डावर हा २५४६ लीटरचा स्टॉक कोणासाठी राखून ठेवला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डिझेलची विक्री:
ओपनिंग स्टॉक १४,९५७ लीटर असताना केवळ १४७३ लीटरची विक्री दाखवून क्लोजिंग स्टॉक १३,४५८ लीटर दाखवण्यात आला आहे. जनतेला डिझेल नाकारले जात असताना हा साठा कोणाच्या इशाऱ्यावर दडवून ठेवण्यात आला आहे?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे (IOC) विक्री अधिकारी *श्री नरेश शर्मा* यांच्या दुटप्पी भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नियम धाब्यावर बसवून महेंद्रा पेट्रोलियमच्या चालकाला पाठीशी घालण्यात शर्मा आघाडीवर असल्याचा आरोप आहे. जिल्हाभरातील पेट्रोल पंपांवर पुरवठा अधिकाऱ्यांचे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. जी काही जुजबी देखरेख किंवा तपासणी सुरू आहे, ती केवळ ‘दिखावेगिरी’ ठरत आहे.
गेल्या ३ महिन्यांत महेंद्रा पेट्रोल पंपावर आलेले हजारो लीटर डिझेल आणि पेट्रोल नक्की गेले कुठे? जर प्रशासनाने प्रामाणिकपणे चौकशी केली, तर पंपाच्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये ही सर्व अनियमितता आणि रात्री चालणारा काळाबाजार उघड होईल का ? नियम धाब्यावर बसवणाऱ्या या पंपाचा परवाना प्रशासन रद्द करणार का ? की आईओसीएल चे भ्रष्ट अधिकारी या प्रकरणावर नेहमीप्रमाणे पांघरूण घालणार, याकडे आता संपूर्ण गडचांदूर परिसराचे लक्ष लागले आहे.



