Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeब्रेकिंग न्यूज़धक्कादायक ! राजुरा महसुल प्रशासनाच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचे विषप्राशन; उपविभागीय अधिकाऱ्यावर (SDO)...

धक्कादायक ! राजुरा महसुल प्रशासनाच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचे विषप्राशन; उपविभागीय अधिकाऱ्यावर (SDO) गंभीर आरोप

राजुरा (चंद्रपूर):
गेल्या ४० वर्षांपासून आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढा देणाऱ्या कुसुंबी येथील २४ शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त शिल्लक शेतकऱ्यांचा संयमाचा अखेर अंत झाला आहे. माणिकगड सिमेंट कंपनीने बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेऊन उत्खनन सुरू केल्याच्या निषेधार्थ आणि महसूल प्रशासनाच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी आज टोकाचे पाऊल उचलत विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या सर्व प्रकाराला राजुराचे उपविभागीय अधिकारी (SDO) रवींद्र माने जबाबदार असल्याचा थेट आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.

नेमके प्रकरण काय

मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबी येथील २४ शेतकऱ्यांच्या जमिनी ‘बोक्कड डोह’ माइन्समध्ये 1982/83 मध्ये संपादित झाल्या . मात्र शिल्लक असलेल्या उर्वरित शेत्या भु-संपादिण प्रक्रियेत सामील नव्हत्या असा शेतकऱ्यांचा दावा आहे. असे असतानाही माणिकगड सिमेंट कंपनीने या जमिनींवर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवला असून गेल्या ४ दशकांपासून तेथे चुनखडीचे उत्खनन सुरू आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी अनेकदा न्यायालयीन आणि प्रशासकीय लढा दिला. अनेक वेळा शेतकऱ्यांच्या बाजूने आदेश येऊनही प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात आली.

एसडीओ’वर कंपनीच्या दलालीचा खळबळजनक आरोप

शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राजुरा येथे रुजू झाल्यापासून SDO रवींद्र माने हे मुख्यालयी न राहता माणिकगड सिमेंट कंपनीच्या *गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होते असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. कंपनीच्या जीवावर राहणे आणि खाणे-पिणे असल्याने अधिकारी शेतकऱ्यांच्या अन्यायाकडे दुर्लक्ष करून कंपनीची बाजू सावरून धरत होते.
६ महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केल्यानंतर हा अधिकारी राजुरा येथे भाड्याने रूम घेऊन राहू लागला, मात्र त्यापूर्वी दोन वर्षे तो कंपनीच्या पाहुणचारात दंग होता.
केवळ माणिकगड सिमेंटच नव्हे, तर WCL मध्ये जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्यात आणि आराजीमध्ये फेरफार करण्यासाठी दलालांमार्फत लाखोंची लूट केल्याचाही आरोप या अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.

आमच्या जमिनी गेल्या नसतानाही कंपनीने ताबा सोडला नाही. न्याय देण्याऐवजी SDO माने यांनी कंपनीची दलाली केली आणि आम्हाला मानसिक त्रास दिला. आमच्या मृत्यूला केवळ रवींद्र माने हेच जबाबदार राहतील,” असा संतप्त पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ
शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित शेतकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. एकीकडे ‘शासन आपल्या दारी’च्या घोषणा दिल्या जात असताना, दुसरीकडे वरिष्ठ महसूल अधिकारीच उद्योजकांच्या दावणीला बांधले गेल्याचा हा आरोप प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारा ठरत आहे.
आता या प्रकरणात राज्य शासन आणि जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात आणि संबंधित अधिकाऱ्यावर चौकशीचे आदेश देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular