शेतकरी व लघु वाहनधारक वाऱ्यावर !
गडचांदूर (प्रतिनिधी):
येथील भारत पेट्रोलियम कंपनीचे ‘साई सर्विस स्टेशन’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मूळ मालक शास्त्रकार यांच्याकडून भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेले चंद्रपूर येथील *’अनंत फ्यूल’* सध्या या पंपाचे संचालन करत आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून या पंपावर सर्वसामान्य ग्राहकांसाठी डिझेलचा एक थेंबही उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे डिझेल नेमके जाते कुठे? असा सवाल आता उपस्थित केला जात असून, यात डिझेल हेरफेरीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय बळावला आहे.
**सामान्यांना ठेंगा, ट्रान्सपोर्टर्सना ‘अर्थ’पूर्ण साथ ?*
मिळालेली माहिती अशी की, भारत पेट्रोलियमकडून या पंपावर डिझेलचा पुरवठा नियमित होत आहे. मात्र, ‘अनंत फ्यूल’च्या व्यवस्थापनाखाली या डिझेलची सर्वसामान्यांना विक्री न करता, ते परस्पर मोठ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चारचाकी वाहनधारक आणि शेतीकामासाठी डिझेल मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना ‘साठा संपला आहे’ असे सांगून रिकाम्या हाती परत धाडले जाते. मात्र, रात्रीच्या वेळी टँकरचे टँकर परस्पर गायब केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
शेतकरी आणि उद्योग अडचणीत
गडचांदूर आणि परिसर शेती व उद्योगांनी व्यापलेला आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर, मळणी यंत्रे आणि इतर यंत्रसामग्री बंद पडली आहे. महिनाभरापासून सुरू असलेल्या या कृत्रिम टंचाईमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, अनंत फ्यूलच्या या मनमानी कारभारामुळे जनसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे.
कायद्याचा बडगा उगारण्याची गरज
पेट्रोलियम पदार्थांची अशी हेरफेरी करणे हा *जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५* च्या कलम ३ आणि ७ नुसार गंभीर गुन्हा आहे. यामध्ये:
*७ वर्षांपर्यंत कारावासाची* तरतूद आहे.
*सोबतच पंपाचा परवाना कायमस्वरूपी रद्द* होऊ शकतो.आणि साठ्याची माहिती लपवल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात.

प्रशासकीय चौकशीची मागणी
चंद्रपूरच्या ‘अनंत फ्यूल’चे या हेरफेरीत नेमके काय ‘योगदान’ आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्हा पुरवठा विभागाने या पंपाचे ‘स्टॉक रजिस्टर’, कंपनीकडून आलेले टँकर आणि प्रत्यक्ष झालेली विक्री याची पडताळणी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
गडचांदूरच्या जनतेने आता याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
पंपावर नियमित आणि सुरळीत डीजल चा पुरवठा केला जात , पंप संचालक गड़बड़ करित असेल तर नक्की कारवाही करू .
भरत गौर ( जिल्हा प्रबंधक भारत पेट्रोलियम चंद्रपुर )



