प्रविण चिडे राजुरा तालुका प्रतिनिधी
विरुर, दि. — विरुर-धानोरा रोडवर आज दुपारी सुमारे 3.00 वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात धानोरा येथील 60 वर्षीय वसंत तुळशीराम माऊलीकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विरुरपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला. धावत्या ऑटो रिक्षाचे समोरचे चाक अचानक निघून गेल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. संबंधित ऑटोचा क्रमांक MH 34 D 5059 असा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत माऊलीकर हे शेती कामानिमित्त विरुर येथे आले होते. काम आटोपून परत गावाकडे धानोरा येथे जात असताना हा अपघात झाला. चाक निघाल्याने वाहनाचा तोल गेल्यामुळे ऑटो उलटून गंभीर जखमी झालेल्या माऊलीकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृत वसंत माऊलीकर हे आपल्या कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने धानोरा व विरुर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
स्थानिकांच्या मते, वाहनांची तांत्रिक तपासणी, चाक व ब्रेक यांची पडताळणी न केल्याने अशा घटना सातत्याने वाढत आहेत. प्रशासनाने बिघाडग्रस्त वाहनांवर कारवाई करून तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.



