‘दैनिक विदर्भ केसरी’चे बातमीदार कुणाल गायकवाड यांचा आरोप; निष्पक्ष चौकशी अन् संरक्षणाची मागणी
चंद्रपुर च्या अन्न व औषध प्रशासन विभागाने सुगंधित तंबाखू तस्करा विरोधातील कारवाहीला लावला ब्रेक – चोर चोर मावस भाऊ झाल्याची चर्चा
चंद्रपूर
तालुक्यातील अवैध सुगंधी तंबाखूची तस्करी आणि पोलीस-तस्करांचे आर्थिक साटेलोटे उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा धक्कादायक प्रकार गोंडपिंपरी येथे समोर आला आहे. गोंडपिंपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आणि सुगंधी तंबाखू तस्कर संगनमत करून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचत असल्याचा खळबळजनक आरोप ‘दैनिक विदर्भ केसरी’चे बातमीदार कुणाल मारोतराव गायकवाड यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
बातमीदारीचा राग अन् सूडबुद्धीने कारवाईचा कट गोंडपिंपरी शहरातील गजानन कॉलेज परिसर व इतर भागात सुगंधी तंबाखूची उघडपणे विक्री सुरू आहे. या अवैध धंद्यांवर आणि पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर कुणाल गायकवाड यांनी ‘विदर्भ केसरी’च्या माध्यमातून वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. या बातमीदारीमुळे हवालदिल झालेल्या ठाणेदारांचे आणि तंबाखू माफियांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आल्याने, पत्रकाराची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी हा कट रचला जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीतील प्रमुख मुद्दे:
- खोट्या गुन्ह्याची भीती: पत्रकाराची पत्रकारिता बंद पाडण्यासाठी खंडणी किंवा ‘सरकारी कामात अडथळा’ आणल्यासारखा (कलम ३५३) गंभीर व खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
- जीवितास धोका: भविष्यात स्वतःला किंवा कुटुंबाला काही शारीरिक इजा पोहोचल्यास किंवा खोटा गुन्हा दाखल झाल्यास त्याला गोंडपिंपरी ठाणेदार व संबंधित तस्कर पूर्णपणे जबाबदार असतील.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव: या संपूर्ण कटकारस्थानाची प्रत विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर परिक्षेत्र) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO, मूल) यांच्याकडेही योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून गोंडपिंपरी पोलिसांना सूडबुद्धीने कारवाई करण्यापासून रोखावे, तसेच वैयक्तिक व कौटुंबिक सुरक्षेसाठी योग्य पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी कुणाल गायकवाड यांनी केली आहे. या अर्जावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय पावले उचलतात आणि तस्करांना पाठीशी घालणाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



