राजूरा (प्रतिनिधी):
राजूरा तालुक्यातील विविध महसूल (तलाठी) कार्यालयांत शेतकऱ्यांकडून ७/१२ उताऱ्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. शासन दरानुसार ७/१२ उताऱ्याकरिता केवळ १५ रुपये आकारले जाणे अपेक्षित असताना, अनेक तलाठी कार्यालयांत शेतकऱ्यांकडून ५० रुपये आकारले जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
याबाबत ललितकुमार सोनी (विरूर) यांनी सांगितले की, “सर्व महसूल तलाठी कार्यालयांत शेतकऱ्यांकडून ७/१२ साठी १५ रुपयांच्या जागी ५० रुपये वसूल केले जात आहेत. जर शेतकऱ्यांनी तक्रार केली, तर संबंधितांवर कारवाई होऊ शकते.”
याच पार्श्वभूमीवर अन्य शेतकारी बांधवांणी सांगितले की, “राजूरा तहसील क्षेत्रात जवळपास प्रत्येक कार्यालयात शासकीय दराच्या दुप्पट, तिप्पट शुल्क घेतले जात आहे. तसेच काही तलाठी नागरिकांच्या फोन कॉललाही प्रतिसाद देत नाहीत, जणू ते तहसीलदारांपेक्षाही मोठ्या पदावर आहेत असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.”
स्थानिक शेतकरी व नागरिक याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत असून, त्यांनी प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषी तलाठ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासनाने ठरवलेल्या दरांपेक्षा अधिक वसुली हा स्पष्ट गैरव्यवहार असल्याने, राजूरा तहसील प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



